

Kagal Javed Pinjari Nomination
कागल: कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथी जावेद पिंजारी यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून वाजत गाजत आणि नाचत जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उमेदवारीची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज (दि.१७) वेगवान घडामोडी घडल्या. राज्यपातळीवर हालचाली गतिमान होऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाडगे आणि समरजीतसिंह घाटगे या तिघांची युती झाल्याची चर्चा होती. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नव्हता.
भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक गटाच्या वतीने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच सर्व उमेदवारांना पक्षाचे अधिकृत फॉर्म देखील देण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील 12 प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाचे ए बी फॉर्म देखील देण्यात आले आहेत.
कागल नगरपालिका निवडणुकीसाठी नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. समरजीतसिंह घाटगे यांना दहा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना 13 जागांचे वाटप झाले आहे. माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगे गट यांची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून संजय घाटगे यांनी जागा मागितल्या होत्या. मात्र चर्चा विस्कटल्याचे समजते. संजय मंडलिक यांनी आपले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने पूर्ण पॅनेल केलेले आहे. मुश्रीफ गटाचे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून भैया माने यांच्या पत्नी शर्मिला माने यांचे नाव निश्चित झाले आहे.