Kadvi River pollution| कडवी नदीपात्रात मृत मास्यांचा खच

शिरगाव-सावर्डे बंधाऱ्यावर उग्र दर्प, जलप्रदूषणाची भीती
Kadvi River pollution| कडवी नदीपात्रात मृत मास्यांचा खच
Published on
Updated on

विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील शिरगाव आणि सावर्डे दरम्यान वाहणाऱ्या कडवी नदीच्या पात्रात मासे मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. कोल्हापूर पद्धतीच्या (के.टी.) बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यात हे मृत मासे तरंगत असून, परिसरात सर्वत्र उग्र दुर्गंधी पसरली आहे. या घटनेमुळे नदीचे पाणी दूषित झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

पाण्याला उग्र वास अन् माशांचा तडफडाट

​या बंधाऱ्यातील पाण्याचा रंग बदलल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले होते. मात्र, आज सकाळी अचानक मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगू लागले. विशेष म्हणजे, या पाण्याला एक प्रकारचा उग्र आणि रासायनिक स्वरूपाचा वास येत असल्याने, नदी पात्रात काही विषारी अंश मिसळले आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

सावर्डे बाजूचा बरगा काढला

​घटनेचे गांभीर्य ओळखून आणि साचलेल्या पाण्यातील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली. बंधाऱ्याच्या सावर्डे बाजूकडील एक 'बरगा' (लोखंडी फळी) काढून पाणी प्रवाही करण्यात आले, जेणेकरून मृतावस्थेतील मासे पात्रातून खाली वाहून जातील. मात्र, तरीही नदीच्या संथ पाण्यात अनेक मासे अडकून पडल्याने दुर्गंधी कायम आहे.

प्रदूषणाचे कारण अस्पष्ट

मासे नेमके कशामुळे मृत झाले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. वाढते तापमान, ऑक्सिजनची घटलेली पातळी की मानवनिर्मित प्रदूषण, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. नदीकाठच्या गावांना याच नदीतून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पाण्याचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मासे मृत पावल्याने नदीच्या जैवविविधतेवर मोठा आघात झाला आहे. मासे मृत होणे ही धोक्याची घंटा आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता प्रदूषणाचे मूळ शोधून काढले पाहिजे. या घटनेमुळे शिरगाव आणि सावर्डे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पाटबंधारे विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news