कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील सराफी बाजार धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी सज्ज झाले आहे. या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा असून ते शुभ मानले जाते. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर 80,800 रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदीचा दर 99,800 प्रतिकिलो झाला आहे. दर वाढला असला तरी लोकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे.
यंदा सोन्याचे दर वाढल्याने ग्राहक हलक्या वजनाच्या दागिन्यांना अधिक पसंती देत आहेत. विशेषतः 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना पसंती मिळत आहे, अंगठ्या, ब्रेसलेटस्, पातळ चेन, छोटे नेकलेस, कानातले स्टडस् आणि बाली अशा दागिन्यांना मागणी आहे. या प्रकारातील लाईट वेट दागिने परवडणारे असून ते रोजच्या वापरासाठीही उपयुक्त ठरतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे थोडे का होईना, सोने घेण्याचा ट्रेंड आहे. यासाठी लोक वर्षभर पैसे वाचवून ठेवत असतात. काही दुकानांमध्ये सुवर्ण भिशी असते, त्यातून दागिना खरेदी करण्यासाठी अनेकजण धनत्रयोदशीला प्राधान्य देतात. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात धनत्रयोदशीच्या निमित्ताने ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येण्याची अपेक्षा असून त्यामुळे सोन्याच्या विक्रीत मोठी उलाढाल अपेक्षित आहे. असे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने सांगण्यात आले.