

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कलरचा वापर न करता तयार केलेला गूळ व्यापार्यांनी खरेदी केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकर्यांनी शनिवारपासून (दि. 11) गूळ उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीने गूळ तयार करताना कलरचा वापर न करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तयार केलेला गूळ व्यापारी खरेदी करत नाहीत. गुळामध्ये कलरचा वापर करायचा का नाही, याबाबात समिती-व्यापार्यांनी भूमिका स्पष्ट करावी. यानंतरच गूळ उत्पादन सुरू करण्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.
समितीने गूळ उत्पादक शेतकर्यांना घातक कलर, केमिकलचा वापर न करता गूळ तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. एका शेतकर्याने शुक्रवारी कलरचा वापर न केलेला 35 बॉक्स गूळ समितीमध्ये आणला; पण कमी दरानेही या गुळाची खरेदी झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न करत उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतला.