

कोल्हापूर : देशभर बहुचर्चित ठरलेल्या गेन बिट कॉईन घोटाळाप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात १६० बिट कॉईनची फसवणूक झाली आहे. त्याचे बाजारमूल्य ९६ कोटी असल्याचे इन्व्हेस्टर वेल्फेअर प्रोटेक्शन असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले.
बुडालेले बिट कॉईन परत मिळावेत, यासाठी गुंतवणूकदार संरक्षण संघटनेमार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नियुक्तीचीही मागणी करण्यात आली आहे. इन्व्हेस्टर वेल्फेअर प्रोक्टेक्शन असोसिएशनचे प्रतिनिधी अशोक मोकरिया, सत्यजित बोधे, दत्तात्रय नकाते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, कोट्यवधीच्या गेन बिट कॉईन घोटाळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह देशभर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. गुंतवणूकदारांच्या हितासाठी असोसिएशनचा सात वर्षांपासून लढा सुरू आहे.
देशभरातील गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन इन्व्हेस्ट वेल्फेअर प्रोक्टेशन असोसिएशन या नोंदणीकृत संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. गेन बिट कॉईन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत आहे, असेही अशोक मोकरिया, सत्यजित बोधे, नकाते, सुहास नागन्नावर यांनी सांगितले.
कंपनीचे काही संचालक, एजंट ७ वर्षांपासून फरार
गेन बिटक्वॉईनमधील झालेल्या घोटाळाप्रकरणी कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये तर २०२१ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यात पोलिसांनी अटक केलेले संशयित सध्या जामिनावर आहेत, तर कंपनीचे काही प्रमुख संचालक, एजंट ७ वर्षांपासून फरार आहेत. फरारी संशयितांना तत्काळ अटक करण्याची मागणी वारंवार केली जात असतानाही तपास पथकाच्या हाताला संशयित लागत नसल्याचेही मोकरिया, बोधे यांनी सांगितले.