कोल्हापूर : चार वर्षापूर्वी तेरा-चौदा वर्षाचा मुलगा गंगावेशमध्ये भीक मागत होता. कोरोनाकाळात शाळा सुटली आणि घरच्या परिस्थितीमुळे ही वेळ आली. शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न डोळ्यात होते खरे, पण समोर फक्त अंधार दिसत होता. आज ते भीक मागणारे हात आयटीआय संस्थेत मशिनिस्ट या ट्रेडमधील तंत्र आत्मसात करत आहेत.
सुनील रमेश पवार या मुलाचा हा प्रवास जितका संघर्षाचा आहे, तितकाच प्रेरणादायी आहे. सुनीलची जिद्द आणि उमेद फाऊंडेशन संस्थेची साथ यातून भरकटलेल्या मुलाच्या आयुष्याला दिशा मिळाली. सुनील मूळचा हातकणंगले तालुक्यातील अमृतनगरचा. वडील कामाच्या शोधात कोल्हापुरात आले. एका गुन्ह्यात ते तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबाची घडीच विस्कटली. आई आणि आजी मोलमजुरी करून घर चालवत होत्या. टेंबलाईवाडी झोपडपट्टीत राहणाऱ्या सुनीलचे शिक्षण सुरू होते. कोरोनाच्या संकटात सुनीलची शाळा बंद झाली. घरची परिस्थिती इतकी बिकट झाली की, सुनीलसमोर भीक मागण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. उमेद मायेचे घर या संस्थेत राहून सुनीलने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. दहावीनंतर आयटीआयमध्ये मशिनिस्ट या ट्रेडमधील शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पुढील दोन वर्षात त्याचा कोर्स पूर्ण होईल. गांजलेल्या परिस्थितीमुळे जे हात भीक मागत होते, ते हात भविष्यात गंजलेल्या मशिन्सची दुरुस्ती करून वेग देण्यासाठी सज्ज होत आहेत.
शिक्षक प्रकाश गाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीलने श्रीराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. भीक मागणाऱ्या हातात वह्या-पुस्तके आली. सुनील अभ्यासात इतका रमला की, दहावीत त्याने ८० टक्के गुण मिळवले.
गंगावेशमध्ये भीक मागून घरी जात असताना त्याने एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. तोच क्षण सुनीलच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ज्या दुचाकीस्वाराला सुनीलने थांबवले, त्यांचा मित्र विक्रम पाटील, कोपार्डे (ता. करवीर) येथील उमेद मायेचे घर येथे कार्यरत आहे. सुनीलच्या परिस्थितीविषयी त्यांनी उमेद संस्थेत कळवले आणि त्यानंतर सुनील उमेद संस्थेच्या वसतिगृहात पुढील शिक्षणासाठी आला.