

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा
जग बदलण्याची ताकद शिक्षकांच्यात आहे. शिक्षकांनी काळानुसार बदलून बहुजनांच्या मुलांच्यासाठी चांगले शिक्षण द्यावे, भौतिक व शैक्षणिक सुविधेसाठी लागणारी मदत करण्याची ग्वाही आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, केंद्रप्रमुख, संघटनांशी संवाद साधला.
शाहूवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या 'कॉपी विथ आमदार' या अभिनव उपक्रमांतर्गत आमदार डॉ. विनय कोरे बोलत होते. डॉ. विनय कोरे पुढे म्हणाले की, शाहूवाडी तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली आहे. शाहूचा वारसा असणाऱ्या शाहूवाडी तालुका स्पर्धात्मक क्षेत्रात अग्रेसर आहे. शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडवून शिक्षकांनी चाकोरी बाहेर जाऊन काम करावे. शाहूवाडी तालुक्यात आठवीनंतर मुलींच्या शिक्षणात गळतीचे प्रमाण अधिक आहे, ही शोकांतिका आहे. त्यासाठी जिथे आठवीचा वर्ग आहे. अशा ग्रामीण भागात मराठी शाळेतच मानधन तत्वांवर शिक्षक नेमून मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.कोरे यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार म्हणाले की, स्पर्धेच्या युगात शिक्षकांनी नवतंत्रांचा वापर करून अपडेट रहावे. या कार्यक्रमात तालुक्याच्या गुणवत्ता, क्रीडा, सांस्कृतिक विकास होण्यासाठी शिष्यवृत्ती शिबिर, नवोदय विद्यालय परिक्षा पध्दत, शासनाच्या माध्यमातून सेमी नवोदय विद्यालय सुरू करावे. क्रीडा प्रबोधिनी बाबत, सौरऊर्जेवरील वीज द्यावी, स्पर्धा परिक्षा केंद्र व्हावे, बी एल ओतून शिक्षकांना वगळावे. संघटनात्मक प्रश्न, उपस्थितीत भत्त्यात वाढ करावी. असे शिवाजी पाटील- रोडे, अशोक पाटील, एम. आर. पाटील, महादेव कुंभार, विनायक हिरवे, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, साहेब शेख, माधुरी कंलडोणे, राजकुमार पाटील, उमेश कुंभार, पूजा कदम, प्रशांत मोहिते, महेश गिरीगोसावी, विक्रम पाटील, माधवी कुंभार, रूपाली मोरचुदे, राम पाटील, युवराज काटकर, दिपक लाड, ज्योती तांजणे, केंद्रप्रमुख प्रकाश काळे आदींनी प्रश्न उपस्थित केले.
"या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब, फेसबुकवर करण्यात आले होते. यात शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख प्रकाश काळे, संग्राम दळवी, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षकांनी परिश्रम घेतले. दरम्यान बहुद्देशीय हॉल, नवप्रवर्तक प्रयोगशाळा, मनोरंजनात्मक विज्ञान व तारांगण येथे भेट दिली. यावेळी वैष्णवी पवार, पुनम भोसले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजयकुमार गावडे यांनी केले. यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप पाटील, केंद्रप्रमुख बाळू कोंडावळे, कृष्णात कडू, सुनिल सुतार यांच्यासह तालुक्यातील ६० उपक्रमशील शिक्षक उपस्थितीत होते.