

Ichalkaranji Panchganga river water level
इचलकरंजी : राधानगरी धरणातून सुरू असलेला विसर्ग व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इचलकरंजी जुना पुल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शहर व परिसरात सोमवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातपळी ५५ फुटांवर गेल्यामुळे महापालिकेच्या आपत्कालिन विभागाकडून जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे जुना पलू या पावसाळ्यात पाचव्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे नदीची पाणीपातळी १५ फुटांनी वाढली आहे. इचलकरंजी येथील नदीची इशारा पातळी 68 फूट असून धोका पातळी 71 फूट आहे. पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिकेचे आपत्कालीन टीम नदी घाटावर सज्ज ठेवण्यात आले आहे.
गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सध्या राजाराम बंधारा पाणी पातळी ३१ फुटांवर पोहोचली आहे. तर इशारा पातळी गाठायला केवळ ८ फूट बाकी आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ४६ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय राधानगरी धरणाचे एकूण सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.