Kolhapur News: कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिका आरक्षण जाहीर
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांच्या निवडणुकीची तयारी वेगात सुरू झाली आहे. मंगळवारी पार पडलेल्या आरक्षण सोडतीत दोन्ही महापालिकांच्या जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेच्या 81, तर इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
कोल्हापूर महापालिकेसाठी यंदा पहिल्यांदाच चारसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचे चित्र काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रवर्गाला जवळपास सर्व प्रभागांत प्रतिनिधित्व मिळाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. या नव्या रचनेमुळे यंदा एखाद्या प्रबळ उमेदवाराचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, इचलकरंजी महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष आहे. एकूण 65 नगरसेवक निवडण्यासाठी 15 प्रभागांमधून प्रत्येकी चार आणि एका प्रभागातून पाच सदस्य निवडले जाणार आहेत. या आरक्षणानंतर दोन्ही शहरांतील राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत उमेदवार निवड आणि गटबाजीचे राजकारण रंगणार आहे.
सोशल मीडियावरुन प्रचार सुरु
आरक्षण सोडत जाहीर होताच त्या प्रभागात स्वतःची उमेदवारी निश्चित झाल्याच्या आनंदात सोशल मीडियावरुन त्यांनी प्रचारही सुरु केला. स्वतःचे फोटो, व्हिडीओ आणि प्रभागाच्या विकासाची आश्वासनेही दिली. कोल्हापूर, इचलकरंजीत उमेदवारांनी अशाप्रकारे समाजमाध्यमांचा वापर आत्तापासूनच सुरू केल्याने निवडणुकीत रंगत वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.
स्थानिक वाहिन्यांवरुन प्रक्षेपण
कोल्हापूर महापालिकेने आयोजित केलेल्या आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण कांही स्थानिक वृत्तवाहिन्यावरुन करण्यात आले. तसेच फेसबुक लाईव्हदेखील नागरिकांना पाहता आले. हा प्रयोग पहिल्यांदाच महापालिकेने केला. ठराविक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि कांही निवडक उमेदवार या सोडतीला प्रत्यक्ष उपस्थित होते. अनेकांनी वाहिन्यांवरुनच थेट प्रक्षेपण पाहून आरक्षणाची माहिती घेतली.
कोल्हापूर
प्रभागांची संख्या : 20
सदस्यांची संख्या : 81
अनुसूचित जाती-11, नागरिकांचा मागास प्रवर्ग-21, सर्वसाधारण महिला-24, सर्वसाधारण-25.
इचलकरंजी
प्रभागांची संख्या : 16
सदस्यांची संख्या : 65
अनुसूचित जाती-6, नागरिकांचा मागास प्रवर्ग-17, सर्वसाधारण महिला-23, सर्वसाधारण-19.

