

हुपरी : पूर्ववैमनस्यातून एडक्याने केलेल्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. हल्लेखोर सराईत गुंड प्रतीक गाट याला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अनिकेत गाट यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शोहेब मुल्ला (वय 30) व रोहित मोडेकर (28, दोघेही रा. संभाजीराव मानेनगर वसाहत, हुपरी) अशी जखमींची नावे आहेत.
शंभर फुटी रस्त्यावरील लाकूड वखारी नजीकच्या खास गांजा ओढण्याचा उद्योग चालणार्या खोलीतच बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. जखमी शोहेब मुल्ला, रोहित मोडेकर व हल्लेखोर प्रतीक गाट हे मित्र आहेत. तिघांवरही गुन्हे दाखल आहेत. एका वादग्रस्त कारणावरून या तिघात वैमनस्य आल्याने यापूर्वी त्यांच्यात हाणामारीही झाली होती.
बुधवारी प्रतीक गाट याने रोहितवर एडक्याने हल्ला केला. या हल्ल्यातून रोहितला वाचविण्यासाठी शोहेबने आपला हात मध्ये घातला असता, त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे निम्म्याहून अधिक तुटली. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी प्रतीक गाट याला पकडून ठेवले होते. पोलिस आल्यानंतर त्याला ताब्यात देण्यात आले.