

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’च्या वतीने कोल्हापुरात 8, 9 आणि 10 मार्चदरम्यान ‘दैनिक पुढारी कोल्हापूर प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या प्रॉपर्टी बाजाराचा सर्वांगीण वेध घेणारी वृत्तमालिका...
गेल्या दोन दशकांत कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून, निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. शहरालगत शहरीकरण वाढत असून, उपनगरांमध्ये नव्याने वसाहती, गृहनिर्माण संकुले आणि व्यावसायिक अस्थापना विकसित होत आहेत. कोल्हापूर शहरात बांधकाम क्षेत्राच्या प्रचंड क्षमता लक्षात घेता मोठ्या शहरांतील बांधकाम व्यावसायिकांनी आता कोल्हापूरकडे मोर्चा वळवला आहे.
कोल्हापुरातील घरांची मागणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. विशेषतः, नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये 2 आणि 3 बीएचके, तसेच लक्झरियस फ्लॅटस्ना मोठी मागणी आहे. औद्योगिक वाढ, शिक्षण संस्थांचा विकास आणि उत्तम हवामान यामुळे गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांना कोल्हापूर आकर्षित करत आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र: कोल्हापूर हे पारंपरिक आणि आधुनिक उद्योगांचे केंद्र आहे. कोल्हापूर मेटल कास्टिंग, साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि चडचए क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे.
शैक्षणिक हब कोल्हापूरमध्ये अनेक नामांकित शिक्षणसंस्था असून संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे रेसिडेन्शियल आणि पेइंग गेस्ट सुविधांसाठी मोठी मागणी आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक आकर्षण अंबाबाई मंदिर, पन्हाळा किल्ला, जोतिबा मंदिर, रंकाळा तलाव यांसारखी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. यामुळे हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायाला चालना मिळत आहे.
कोल्हापूरमध्ये एमआयडीसी, ऑटोमोबाईल आणि कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित होत असल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. परिणामी, लोकसंख्या आणि गृहनिर्माणाची मागणी वाढत आहे. इथली क्षमता लक्षात घेता साधारणपणे आज केलेल्या गुंतवणुकीला येत्या 2 ते 3 वर्षात 50 टक्क्यापेक्षाही जास्त परतावा मिळण्याची संधी इथे दिसते