कोल्‍हापूर : विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा; सापडलेले ५० हजार महिलेस केले परत

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा
विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा

विशाळगड : सुभाष पाटील समाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला असल्याचे जागोजागी दिसत असले, तरीही एखाद्याला सापडलेला ऐवज प्रामाणिकपणे परत करण्याच्या घटनाही समोर येत असतात. अशा घटनांमुळे समाजातील लोकांमध्ये अजुनही नैतिकता शिल्लक असल्याची ही पावतीच समजावी लागेल. याचीच प्रचिती सावे (ता. शाहूवाडी) येथील इयता सातवीत शिकणाऱ्या वैष्णव लक्ष्मण चौगले या शालेय विद्यार्थ्यांने दिली. सावे फाटा येथे सापडलेले पन्नास हजार रुपये त्याने संबंधित महिलेस परत केले. विशेष म्हणजे त्याला बक्षीस म्हणून पाच हजार रुपये ती महिला देत असतानाही ती रक्कम घेण्यास त्‍या विद्यार्थ्यांने नम्रपणे नकार दिला. त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णव हा आपल्या मामाकडे गणपती सणानिमित्त चार दिवसांपूर्वी घुंगुर या गावी गेला होता. गणपती विसर्जनानिमित्त तो आपल्या गावी सावेकडे बांबवडे -मलकापूर बसमधून येत होता. सावे फाटा येथे उतरताच पाऊस पडत असल्याने तो रेणुका मंदिराशेजारी उभा राहिला. तत्पूर्वी वडील लक्ष्मण यांना त्‍याने मी फाट्यावर थांबतो तुम्ही मला न्यायला या, असा फोन करून सांगितले होते. तो मंदिराशेजारी थांबला असता, त्याला महिलेची पर्स पडल्याची निदर्शनास आले. त्याने उघडून पाहिले असता, त्यामध्ये चक्क ५० हजार रुपये आढळले. त्याचबरोबर संबंधित महिलेचे जॉब कार्ड, आधारकार्ड ही आढळले. त्याने ते जपून ठेवले.

दरम्यान सुरेखा निवृत्ती साठे (लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांना भाऊ नसल्याने सावे येथे आपल्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या (दि २५) रोजीच्या तयारीसाठी कोल्हापूरहून बसमधून शनिवारी (दि २३) रोजी दुपारी तीनच्या सुमारास सावे फाटा येथे आल्या होत्‍या. काही काळ त्या मंदिराशेजारी थांबल्या होत्या. त्या इतर साहित्य घेऊन घरी गेल्या, मात्र त्यांची पर्स मंदिराबाहेरच पडली होती. ही माहिती वैष्णव व त्याचे वडील लक्ष्मण यांना समजताच त्यांनी त्वरित त्यांचे घरी जाऊन जॉब कार्ड व आधारकार्ड याची ओळख पटवून त्यांच्याकडे त्यांचे ५० हजार रुपये त्यांना परत केले. वैष्‍णव हा शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याचे वडील शेतकरी आहेत.

रस्त्यावर पडलेली शंभर रुपयांची नोट जर सापडली, तर ती नोट आपलीच आहे, असे म्हणत ते पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. चुकीने बँक खात्यावर जमा झालेली रक्कम काढून खर्च केल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, मतलबी दुनियेत आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे, याचा प्रत्यय सातत्याने येत असतो. अशीच एक घटना सावे येथे घडली. सातवीच्या विद्यार्थ्याला घरी जाताना रस्त्यावर सापडलेले ५० हजार रुपये महिलेला परत केले. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

मुलाचे आई-वडील व शिक्षकांकडून चांगले संस्कार या मुलावर झाले. त्याने प्रामाणिकपणा दाखविल्याने मला पैसे मिळाले. मी त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल मी त्याला पाच हजार दिले तेही त्याने नाकारले.
– सुरेखा साठे, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news