

कोल्हापूर : समाजाच्या चौकटीत अनेकदा नाकारले जाणारे; पण आयुष्य जगण्याची जिद्द न हरवणारे चेहरे, अशा एचआयव्हीसह जगणार्या तरुण-तरुणींसाठी कोल्हापुरात आशेचा किरण ठरलेला एक अनोखा वधू-वर परिचय मेळावा रविवारी पार पडला. एचआयव्हीचा त्रास सहन करणार्या तरुणाईने आयुष्याच्या जोडीदाराची निवड केली.
जाणीव फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित या मेळाव्यात 18 ते 40 वयोगटातील सुमारे 80 उपवर-उपवधूंनी सहभाग घेतला. एकमेकांच्या वेदना आणि वास्तव समजून घेत आयुष्याचा जोडीदार शोधत विवाहवेदीवर पॉझिटिव्ह सप्तपदी चालण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या तरुण पिढीची कहाणी केवळ आजाराची नाही, तर संघर्ष, स्वीकार आणि आत्मविश्वासाची आहे. बालपणातच पालकांकडून एचआयव्हीची लागण झालेली ही मुलं-मुली आज आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव ठेवून जगत आहेत; मात्र त्यांनी आयुष्य थांबू दिलं नाही.
कोणी इंजिनिअर, कोणी प्राध्यापक, तर कोणी व्यावसायिक शिक्षणात पदवीधर आहे. शिक्षण, करिअर आणि आत्मविश्वास असूनही, वैयक्तिक आयुष्यातील ‘सोबती’ची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसून आले. ‘आम्हालाही प्रेम हवंय, संसार करायचाय; पण आमच्या आजारामुळे अनेकदा नकार मिळतो,’ अशी भावना काही सहभागी तरुणांनी व्यक्त केली. त्यांचा आवाज हा केवळ वैयक्तिक वेदनेचा नाही, तर समाजाने द़ृष्टिकोन बदलण्याचा आहे.