

इचलकरंजी : प्रार्थनास्थळ बंद केल्याच्या कारणावरून दबावाने व अन्यायी भूमिकेतून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, पोलिस ठाण्याच्या आवारात प्रार्थना करणार्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांसाठी मंगळवारी शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना धारेवर धरले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
तीन तासांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी पोलिस ठाणे आवारात प्रार्थना करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कोल्हापूर रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील एका इमारतीत रविवारी सायंकाळी सामूहिक प्रार्थनेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. या अनुषंगाने भक्ती व प्रार्थना बंद पाडल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी समस्त शालोम चर्च व ख्रिस्ती समाजाच्या वतीने पोलिसांकडे केली होती. सोमवारी रात्री हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. शासकीय आवारात प्रार्थना करणार्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय पोलिस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली. तासाभरानंतर गजानन महाजन गुरुजी व कार्यकर्ते जमा झाले. धर्मांतरासारखे प्रकार घडत असताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करीत महाजन गुरुजींसह कार्यकर्त्यांनी शासकीय आवारात प्रार्थना करणार्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय हटणार नाही, असे म्हणत ठिय्या आंदोलन केले. गुन्हे दाखल न केल्यास श्री शिवतीर्थ येथे जाऊन हिंदुत्ववाद्यांवरील अन्यायाची भावना सर्वांसमोर मांडणार असल्याची भूमिका त्यांनी पोलिसांना सांगितली. यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
प्रार्थना व भक्तीला विरोध करून समाजाच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शिवप्रसाद व्यास यांच्यासह 7 ते 8 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. याची फिर्याद बिशप संजय शामसुंदर आढाव (वय 54, रा. राजर्षी शाहू पुतळ्याजवळ) यांनी दिली आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला होता. बेकायदा जमाव जमवून प्रार्थना व भक्तीला विरोध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव करीत आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात विनापरवाना धार्मिक प्रार्थना, भक्ती केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी संजय आढाव, आलीस आवळे, अंकिता दत्ता कांबळे (रा. सिद्धार्थ हौसिंग सोसायटी), दीपा प्रमोद कांबळे (रा. माणकापूर), योगेश महादेव पवार, पवन कृष्णा खोत (दोघे रा. नदीवेस नाका), संदीप शिवाजी कदम (रा. तिळवणी), अब—ाहम आवळे, राजू बेनाडे, एक्स. एम. फर्नांडिस, सुनील हेगडे, दीपक आवळे, रिजॉय राजन, संजय बनगे, सुभाष आवळे, राम केंगार, नंदकुमार कांबळे, संजय रेंदाळकर यांच्यासह अन्य अनोळखी 15 अशा 33 जणांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार रविवारी घडला होता. याची फिर्याद मंगळवारी पो.कॉ. संतोष धनगर यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक साने करीत आहेत.