

कोल्हापूर : शहरालगतच्या हायवे परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण 3 लाख 5 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फारुख नजीर मुल्लाणी (38, रा. रेंदाळ, ता. हातकणंगले), जितेंद्र आप्पासाहेब घोडके (50, रा. चिकोडी, बेळगाव), अजित बाळासाहेब कोरवी (29, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) आणि जॉनसन जेरून फर्नांडिस (34, रा. मुरगूड, ता. कागल) अशी संशयितांची नावे आहेत. अधिक तपासात अजित कोरवी बेटिंग अड्ड्याचा मुख्य मालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मोबाईलद्वारे लावला जात होता सट्टा
हायवेवरील एका हॉटेलच्या रूममध्ये मोबाईल फोनद्वारे ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट सामन्यांवर हार-जितचा सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता संशयित सट्ट्याचे व्यवहार करताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.