

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठ शेंडा पार्क येथील ७५ एकर जागेत साकारले जाणार आहे. यापूर्वी देण्यात आलेली २३ एकर आणि अतिरिक्त ५२ एकर जागा खंडपीठासाठी महसूल विभागाने विधी व न्याय विभागाला प्रदान केली. रविवारी कोल्हापूर सर्किट बेंच वर्षपूर्ती कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या अतिरिक्त जागेचा सातबारा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि कोल्हापूर सर्किट बेंचच्या वरिष्ठ न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आले आहे. त्याचे रुपांतर लवकरच खंडपीठात होणार आहे. याकरिता महसूल विभागाने १६ ऑगस्ट २०२५ रोजी शेंडा पार्क येथील रि.स.नं. ५८९/१. ५८९/२. ५८९/३. ५८१४, ५८९/५ व ६०४/१ अशी एकूण ९.१८.४० हे. आर (२३ एकर) इतकी शासकीय जमीन खंडपीठासाठी विधी व न्याय विभाग यांस प्रदान केली आहे. यानंतर अतिरिक्त जागेची मागणी झाल्याने यापूर्वी दिलेल्या जमीनीलगतच असलेल्या रि.स. नंबर ५९०/१,२.३.४.५.६ मधील एकूण ३ हेक्टर १० आर. व ५९१ मधील २१ हेक्टर १७ आर. अशा एकूण २८ हेक्टर २९ आर. क्षेत्रापैकी २१.१७ हे. आर (५२ एकर) इतके क्षेत्र खंडपीठासाठी भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किमतीने, कब्जेहक्काने (पूर्वी उपलब्ध करून दिलेली २३ एकर आणि या आदेशान्वये उपलब्ध करुन देण्यात येणारी ५२ एकर अशी एकूण ७५ एकर जमीन) प्रदान करण्याचा निर्णय घेत १४ ऑगस्ट २०२६ रोजी महसूल विभागाने त्याचा आदेश काढला.
या आदेशानुसार प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठाच्या नावाने अतिरिक्त ५२ जागेचा सातबारा १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला. यानंतर आवश्यक ७५ एकर जागेचा सातबारा रविवारी पालकमंत्री आबिटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि कोल्हापूर सर्किट बेंचच्या वरिष्ठ न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्याकडे हस्तांतरित केला. यामुळे यापूर्वीची २३ एकर जागा आणि आता नव्याने दिलेली ५२ एकर जागा अशी खंडपीठासाठी एकूण ७५ एकर जागा देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, खा. शाहू महाराज यांच्यासह व्यासपीठावर उच्च न्यायालय, सर्किट बेंचचे न्यायमूर्ती, जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.