

कोल्हापूर : कोल्हापूर शहर सद्या हेरिटेज लूकच्या दिव्यांनी लख्ख उजळले आहे. यामुळे सहाजिकच शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव असणारी वारसास्थळेही उजळली आहेत. प्रत्यक्षात या वारसा स्थळांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी कोणतीही उपाय-योजना नसल्याने वारसा स्थळांच्या यादीतील अनेक वास्तू नामशेष झाल्या आहेत. उरल्या-सुरल्या वास्तूंची अवस्था दयनीय झाली आहे.
वारसास्थळांच्या जतन-संवर्धन-संरक्षणाच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने 2003 ला हेरिटेज यादी तयार केली. शासकीय इमारती, सार्वजनिक-निम सार्वजनिक, सार्वजनिक ट्रस्टच्या वापरातील इमारती आणि खासगी वापरातील इमारती अशा मुख्य चार विभागांत ग्रेड 1, 2 व 3 अशी त्यांची वर्गवारी केली. या यादीत सुमारे 75 ऐतिहासिक वास्तूंचा समावेश होता. यानंतर सुमारे 10 वर्षांनी या यादीत शहरातील ऐतिहासिक पुतळे, स्मारके व उद्यानांचाही समावेश करण्याची सूचना अभ्यासकांनी केली; मात्र मनपा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे तब्बल 22 वर्षे लोटली, तरी ही यादी केवळ कागदोपत्रीच असल्याचे वास्तव आहे.
महापालिकेने तयार केलेल्या वारसास्थळांच्या यादीतील अनेक वास्तू देखभाल-दुरुस्तीअभावी नामवशेष झाल्या आहेत. यात शाहूपुरीतील स्टेशन बंगला, जुना राजवाडा परिसरातील राजज्ञा वाडा, प्रिन्स शिवाजी हॉल, शिवाजी पार्कमधील जुना एनसीसी बंगला, पंचगंगा पुलावरील शाहूकालीन हौद, पाण्याच्या खजिन्याकडे पाणी वाहून नेणार्या कमानी अशा अनेक वास्तूंचा समावेश आहे.
मनपाच्या उदासीनतेमुळे आणि प्रशासकीय कारकिर्दीत या यादीकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या वास्तूंना आवश्यक कोणत्याही प्रकारचा निधी राज्य व केंद्र शासनाकडून मिळालेला नाही. बिंदू चौकातील तटबंदी झाडा-झुडपांमुळे ढासळत आहे. खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. रंकाळा तलावाच्या कठड्याचे नक्षीदार दगड गायब झाले आहेत. रंकाळा टॉवरला भेगा पडल्याने तो धोकादायक बनला आहे.