Kolhapur Rain : शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

ग्रामीण भागात हलक्या ते मध्यम सरी : आज जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’
Kolhapur Rain update
शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शहरात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. कुठे कमी तर कुठे मध्यम सरी बरसल्या. तर काही ठिकाणी पावसाचा हलका शिडकावा झाला. सकाळी नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कावळा नाका परिसरात दमदार पाऊस झाला. सायंकाळी राजारामपुरी, टाकाळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची एकच तारांबळ उडाली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागतही पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने जिल्ह्याला बुधवारी (दि. ३०) विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वारा आणि पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

शहरात १२ दिवसांनंतर मंगळवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून मधून हलक्या सरी बरसत होत्या. सकाळी शहराच्या रुईकर कॉलनी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरासह काही भागात मध्यम सरी बरसल्या. यानंतर दुपारनंतर देखील पावसाने शहरात हजेरी लावली. नागाळा पार्क, राजारामपुरी, हुतात्मा गार्डन ते हॉकी स्टेडियम चौक, रामानंदनगर, जरगनगर, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहतसह काही भागात पाऊस झाला. दरम्यान, कमाल तापमान ३१.१ तर किमान तापमान २३.६ अंशांवर होते. गेल्या २४ तासांत हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, करवीर, कागल, गडहिंग्लज या तालुक्यांत हलक्या सरी बरसल्या.

कोतोली : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात, नाचणी, भुईमूग यांसह खरीप पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली होती. पिके करपण्याच्या मार्गावर असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण असून, पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पेठवडगाव : पेठवडगावसह वाठार, किणी, घुणकी, भादोले परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.

शिरोली पुलाची : परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या आठवड्यात पावसाचे तिसऱ्यांदा आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खोची : खोची, बुवाचे वठार परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. भात, भुईमूग व ऊस पिकाला पावसाची फार मोठी गरज होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news