

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या चार दिवसापासून ऐन उन्हाळ्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या या पावसाने गेल्या दीड दशकातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कृषी विभागाच्या एका अहवालानुसार जिल्ह्यात 23 मे पर्यंत सरासरी 128.3 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ही नोंद मागील दीड दशकातील सर्वाधिक आहे. मे महिन्याची सरासरी (51.5 मि.मी.) गाठल्यानंतरही पावसाचे सत्र सुरूचआहे.
कोल्हापुरात यंदा उन्हाळ्यात पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातून सुरू झालेल्या वळीव पावसाने नवे विक्रम प्रस्थापित केले. पावसाळ्यासारखा पाऊस सुरू आहे. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सखल भागांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मे महिन्यात कोल्हापुरात यापूर्वी असा धुवाँधार पाऊस 2021 (126.4 मि.मी.), 2022 (66 मि.मी.), आणि 2015 (50 मि.मी.) साली झाला होता.
मात्र यंदाचा पावसाने हे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 2006 नंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 2006 साली 7 दिवसात 195.4 मि.मी. पाऊस झाला होता. गत वर्षी (2024) कोल्हापुरात 62.3 मिमी पाऊस झाला होता, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण तब्बल दुप्पट आहे.
कोल्हापुरात मे महिन्यात पावसाचे दिवस आणि तीव्रता पाहता विविध वर्षांमध्ये पावसाचा पॅटर्न बदललेला दिसतो. 2022 मध्ये फक्त 2 दिवसांत 66 मिमी पाऊस झाला, म्हणजेच सरासरी 33 मिमी प्रति दिवस. याउलट 2021 मध्ये 11 दिवस पावसाचे असूनही सरासरी 11.5 मिमी प्रति दिवस होता. यंदा कमी दिवसांत पावसाची तीव्रता अधिक आहे. मे महिन्यातील पावसाचे दिवस व तीव्रता पाहता हा हवामान बदलाचा स्पष्ट संकेत असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.