

कोल्हापूर : शहरात दुपारी साडेचारच्या सुमारास 20 ते 25 मिनिटे झालेल्या धुवाँधार कोसळधारांमुळे शहराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, असेंब्ली रोड, ताराराणी चौक, शाहूपुरी, कोंडा ओळसह शहरातील सखल भागांत पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या जोरदार सरींमुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. वारा आणि जोरदार सरींमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातील मोठे झाड वाहनांवर कोसळले. गेल्या 24 तासांत शहरात 13 मि. मी. पाऊस झाला.
शहरात दिवसभर उन्हाचा तडाखा, सायंकाळनंतर पावसाच्या सरी आणि रात्री थंडी अशा तीनही ऋतूंची अनुभूती येत आहे. गुरुवारी दिवसभर उन्हाचा तडाखा होता. दुपारी चारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाल्याने काळोख झाला होता. साडेचारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि धुवाँधार सरी कोसळू लागल्या. बघता बघता पावसाचा जोर चांगलाच वाढला. सुमारे 25 मिनिटे जोरदार सरी कोसळल्यानतंर पावसाचा जोर ओसरला; मात्र या 20 मिनिटांतच शहराला तळ्याचे स्वरूप आले होते.
शहरातील सखल भागांत पाणीच पाणी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून बाळकृष्ण हवेलीकडे जाणारा रस्ता पूर्ण पाण्यात गेला होता. या संपूर्ण रस्त्यावर फूटभर पाणी साचले होते. याशिवाय असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. असेच चित्र शहरातील प्रवेशद्वारापासून पाहायला मिळाले. ताराराणी चौकात पाणीच पाणी झाले होते. याशिवाय स्टेशन रोड, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी जनता बझार चौक, खाऊ गल्ली, उद्यमनगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्ता रस्त्यावर गुरुवारी मोठे झाड पडले. यामुळे हा मार्ग बंद झाल्याने असेंब्ली रोडवरून येणारी वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाहतूक सुरू होती. अग्निशमन विभागकडून फांद्या कटरने कट करण्यात आल्या.
कसबा बावडा : कसबा बावडा - लाईन बाजार परिसराला दोन तास पावसाने झोडपले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दुपारी चार ते सायंकाळी सहादरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक सुरू झालेल्या पावसाने दुचाकीस्वारांची त्रेधातिरपीट उडाली. मिळेल त्या ठिकाणी वाहनधारकांनी आसरा घेतला.