Kolhapur Heavy Rain
निनाई परळे येथील कडवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.Pudhari News

कोल्हापूर : कडवी धरणातून २२९० क्यूसेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कडवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद
Published on

विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Heavy Rain : शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  निनाई परळे येथील कडवी धरणातून प्रतिसेकंद २२९० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत असल्याने कडवी नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहे. नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात १२० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली. 

कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५२ टीएमसी आहे. धरण दि २२ रोजी १०० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कडवी धरणाच्या सांडव्यातून प्रतिसेकंद २०७० क्यूसेस तर विद्युत गृहातून २२० क्यूसेस असा एकूण २२९० क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. कडवी नदीवरील कोपार्डे, शिरगाव, सवते-सावर्डे, सरूड-पाटणे हे बंधारे पाण्याखाली आहेत. धरण क्षेत्रात आजअखेर २१८२ मिमी पाऊस झाला, गतवर्षी १७७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीपेक्षा धरण क्षेत्रात ४११ मिमी पाऊस जादा बरसला आहे. नदी, नदी दुथडी वाहत असल्याने शेती कामांचाही खोळंबा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी २.१८ टीएमसी म्हणजे ८७ टक्के धरण भरले होते. तर २०२० साली ५४ टक्के धरण भरले होते. 

कासारी ७५ टक्के भरले

कासारी पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता २.७७४ टीएमसी आहे. धरण ७५ टक्के भरले असून आजअखेर २७९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २२८५ मिमी पाऊस झाला होता. प्रतिसेकंद ११७० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात होत आहे. त्यामुळे यवलूज, पुनाळ-तिरपन, ठाणे-आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेन, कुंभेवाडी हे बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. 

पांढरेपाणी-पावनखिंड दरम्यान झाडे कोलमडली

ऐतिहासिक पावनखिंड मार्गावरील सोसाट्याचा वादळी वारा व मुसळधार पावसाने झाडे कोलमडली आहेत. रस्त्यात झाडे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून झाडे बाजूला सारण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news