

सांगली : महापालिका आयुक्त सुपारी घेऊन खोकीधारकांना विस्थापित करीत आहेत, असा आरोप भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केला. त्यांच्या भूमिकेच्याविरोधात 19 मार्चपासून तीव्र आंदोलन उभारण्याचाही इशारा त्यांनी दिला.
मंगळवारी खोकीधारक आणि कष्टकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, गणेश मार्केट खोकी संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते, युसूफ जमादार, रत्नाकर नांगरे आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज पवार म्हणाले की, महापालिका आर्थिक संकटात असताना आयुक्त उत्पन्न वाढीसाठी काहीही प्रयत्न न करता अधिकृत खोकीधारकांना विस्थापित करीत आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांची सुपारी घेऊन गोरगरीब खोकीधारक व छोटे व्यापारी यांच्याकडे अधिकृत परवाना नसल्याचे दर्शवून त्यांच्या व्यवसायावर बुलडोझर चालवून त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करीत आहेत. वास्तविक ते गेल्या 40 ते 50 वर्षांपासून खोक्यामध्ये त्यांचे व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहेत. काढलेल्या खोक्यांचे 19 मार्चपर्यंत पुनर्वसन न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेकडे खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी धोरण आहे. त्याचा वापर करावा. महापालिका आयुक्तांना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे. खोकीधारकांना नोटीस लागू होत नसताना नोटीस देऊन चुकीची कारवाई करण्यास भाग पाडले आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.