

Hatkanangale Bhendwade Murder Case
पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे दारूच्या नशेत सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान सख्ख्या भावाच्या खुनात झाले. सततच्या त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावाच्या पोटात सुरीने वार केल्याने अमर बापूसो चव्हाण (वय ३३) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी किशोर बापूसो चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी मृताची पत्नी पियुषा अमर चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर चव्हाण हे व्यसनाधीन होते. मद्यधुंद अवस्थेत ते वारंवार पत्नी, भाऊ आणि शेजाऱ्यांशी वाद घालत असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी दुपारपासून त्यांनी घरात गोंधळ घातला होता. रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा मद्यप्राशन करून त्यांनी लहान भाऊ किशोर चव्हाण यांच्या घरासमोर येत दरवाजावर लाथा मारणे, कुऱ्हाडीने प्रहार करणे आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या किशोर चव्हाण यांनी, "तू सारखा त्रास देतोस, तुला ठेवत नाही," असे म्हणत अमर यांच्या पोटात सुरीने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या अमर चव्हाण यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर तसेच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, पोलिसांनी किशोर चव्हाण याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार राम कोळी, शिवानंद मतपती आणि सतीश सूर्यवंशी यांच्या पथकाने आरोपीची चौकशी केली.
पियुषा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून किशोर बापूसो चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक गोरख चौधर करीत आहेत.
दरम्यान, पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अमर चव्हाण यांच्यावर भेंडवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.