

चंदगड : चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेवर हाजगोळी ते सरोळी (ता. चंदगड) या रस्त्यावरील शेतातील एका पोल्ट्री फार्ममध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला.
शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्रीनंतर या संबंधित गावांमधून कारवाईला प्रारंभ केला. याप्रकरणी बेळगावचे दोघे, स्थानिक चौघा तरुणांना ताब्यात घेतले आहे. तर मुंबईच्या तिघाजणांना या आधीच ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही या पोल्ट्री शेडमध्ये कारवाई सुरू होती.
घटनास्थळी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी एम. एम. मकानदार, गडहिंग्लज उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, चंदगडचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्यासह स्थानिक पोलीस, कोल्हापूर पोलीस तसेच पुणे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स चा मोठा फौजफाटा घटनास्थळी ठाण मांडून होता. शनिवारी रात्री अकरानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची खातरजमा करण्याचे काम कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबच्या पथकाकडून सुरू होते. मिळालेला साठा हा कोट्यवधींचा असला तरी अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.
काही दिवसापूर्वी कुर्ला, मुंबई या ठिकाणी एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. याचा तपास सुरू असताना चंदगड येथील धागेदोरे मिळाले. या प्रकरणाचे बेळगावशी कनेक्शन असून बेळगाव येथील एमडी ड्रग्ज तस्करांचा संबंध असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पप्पू विठ्ठल मलतवाडकर ( वय ३०) याने आपल्या स्वतःच्या पोल्ट्रीमध्ये हा साठा ठेवला आहे. या प्रकारात त्याला मदत असणाऱ्या संतोष सदानंद बसरीकट्टी (वय ३०, रा. तुडये, ता. चंदगड), किरण अशोक शिंदे (वय २९, रा. तुडये, ता. चंदगड ), रोहित शिंदे ( वय ३०, रा. हाजगोळी, ता. चंदगड) यांच्यासह अन्य काही तरुणांना पोल्ट्री शेडमध्ये नेऊन पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये आणखी काही तरुणांचा सहभाग असून त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असून यामध्ये मळवी (ता. चंदगड ) येथील दोन तरुणांचा यात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील तीन दिवसापासून पुणे येथील पोलिसांचे पथक या परिसरात साध्या वेशात फिरून माहिती गोळा करत होते. शुक्रवारी रात्री बारानंतर या सर्व संशयतांच्या घरावर छापा टाकून या तरुणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार या पोल्ट्री फार्ममध्ये केवळ साठा करण्यात येत होता. मात्र अन्य काही रसायन उपलब्ध झाल्याने या ठिकाणी एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत होते का याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून विविध प्रकारचे रसायन, काचेची उपकरणे, वजन काटे इलेक्ट्रिक हीटर मिक्सर, ड्रिल सदृश्य मशीन, विविध पदार्थ व अन्य उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
चंदगड तालुक्यात तिसऱ्यांदा कारवाई
हाजगोळी येथे झालेली कारवाई चंदगड तालुक्यातील अमली पदार्थ विरोधी तिसरी कारवाई असून यापूर्वी ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरी सुरू होती, ही मुंबई पोलिसांनी उघडकीस आणली. यानंतर म्हाळेवाडी (ता. चंदगड) या ठिकाणी एका फार्मासिस्ट तरुणाला अटक केल्यानंतर ड्रग्ज निर्मितीचे कारनामे उघडकीस आले होते. आता तिसऱ्यांदा हाजगोळी येथे कारवाई झाल्याने सीमाभागात खळबळ उडाली आहे.
तीन राज्यांच्या सीमा आणि साठा लपवण्यासाठी सुरक्षित जागा
चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेवर दुर्गम भागात हा गैरप्रकार सुरू होता. या ठिकाणापासून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे ड्रग्ज तस्करांना हा भाग सोयीचा होता. यादरम्यान बेळगाव येथील काही ड्रग्ज पेडलर्सनी केवळ साठा लपवून ठेवण्यासाठी योग्य जागा म्हणून या पोल्ट्री फार्मचा वापर व्हायचा की या ठिकाणी ड्रग्ज निर्मिती व्हायची, या दृष्टीने ही तपास सुरू आहे.