

नागाव : महामार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या अपघाताच्या तपासादरम्यान गुटखा तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे २० पोती अवैध गुटखा आढळून आला. पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा आणि २३ लाख रुपये किमतीचे वाहन, असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारमधून महामार्गावरून अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक केली जात होती. पोलिसांच्या कारवाईची भीती असल्याने वाहनचालकाने कार भरधाव वेगाने चालविल्याचे सांगण्यात येते. मात्र, अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात एका निष्पाप तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुटखा तस्करांच्या बेजबाबदारपणामुळे तरुणाचा जीव गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा तस्करीविरोधात कारवाई सुरू असताना तस्करांकडून महागड्या वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. महामार्गावरून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता, त्यामागील मुख्य सूत्रधार आणि गुटखा तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्गावर २४ तास कडक नाकेबंदी आणि गस्त वाढवावी, अशीही मागणी होत आहे.