

कोल्हापूर ः कोल्हापूर शहरातील गुंठेवारी नियमितिकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. महापालिका प्रशासनाने बुधवारी (दि. 18) हा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रूपाराणी निकम होत्या. आयुक्त के. मंजुलक्ष्मी प्रमुख उपस्थित होत्या.
महापालिकेचे दुकानगाळे, खुल्या जागा, इमारती, केबिन यांच्यासाठी अभय योजना लागू करणे, अग्निशमन दलाकडील फायर फायटर, रुग्णवाहिका, शववाहिका यांच्या भाड्याचे दर वाढविणे, पाणी नळ कनेक्शनसाठी खोदाईचे दर जुन्या दराप्रमाणे आकारावेत, थकीत पाणीपट्टी व घरफाळ्याच्या दंडामध्ये शंभर टक्के सूट देणे, महापालिकेच्या अस्तित्वातील शाळा व बंद पडलेल्या शाळा कोणत्याही उपक्रमास देऊ नयेत, तसेच बंद पडलेल्या शाळा पुनर्जिवीत कराव्यात, टेंबलाईवाडी, विक्रमनगर येथील आय. टी. पार्कसाठी आरक्षित 12 हजार चौ. मी. जागा भागातील नागरिक, खेळांडूना क्रीडांगणासाठी आरक्षित करावी आदी ठराव महासभेत मंजूर करण्यात आले.