

कोल्हापूर : पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.10) संपूर्ण दिवस ‘ग्रीन डे’ आणि मअर्थ मिनिटफचे आयोजन केले आहे. वीज, इंधन, कागद, प्लास्टिक आणि मोबाईल यांचा कमीतकमी वापर करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन देशभर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
उपक्रमाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. यावेळी विभागीय आणि तालुका स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांना दूरद़ृश्य प्रणालीद्वारे सूचना देण्यात आल्या. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सहकारी संस्थांमध्ये हा अभिनव उपक्रम साजरा करावा, असे सांगण्यात आले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी हा देशातील अभिनव उपक्रम असून एक दिवस आपल्या आरोग्यासाठी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर यांनी सादरीकरणातून उपक्रमाची माहिती दिली.