

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : ‘गोकुळ’वर सत्ता आणण्यासाठी दावे-प्रतिदावे केले जात असले तरी प्रत्यक्षात जमवाजमवी झाल्याशिवाय हे शक्य नसते हे नेत्यांनाही माहीत आहे. म्हणूनच गोकुळच्या निवडणुकीत दिले जाणारे टोकन चर्चेत आले आहे. ज्याची टोकन जास्त त्यांची सत्ता हे स्पष्ट आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर टोकनबाबत आरोप करून महादेवराव महाडिक यांनी आपला सिंहाचा वाटा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुश्रीफ यांनी स्थानिक पातळीवर जोडण्या केल्या आहेत, तर महाडिक काका-पुतण्यांनी गोकुळसाठी मुंबई, दिल्लीला जाण्याची तयारी केली आहे.
मात्र, खरा मुद्दा आहे तो मतदारांचा मूळ मतदार अधिक वाढीव मतदार कोणाकडे जाणार यावर गोकुळच्या सत्तेचा निकाल लागणार आहे. मुळात गोकुळमध्ये सत्ताबदल झाला तो विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी महादेवराव महाडिक यांच्याकडे परंपरेनुसार ठराव न देता स्वतःच दाखल केले तेथूनच गोकुळचे राजकारण फिरले. पहिली चार वर्षे अध्यक्षपदाची कारकीर्द पार पडली. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात जे सत्तांतर झाले त्याचा परिणाम या राजकारणावर झाला.
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाने लढविल्या. या दोन्ही जागा जिंकून पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण डोंगळे यांना शिवसेनेच्या प्रचारात गुंतवले. खरे तर महाविकास आघाडीची सत्ता गोकुळवर होती. मात्र अचानकपणे अरुण डोंगळे यांनी घेतलेले राजकीय वळण गोकुळच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले. लोकसभेला शिंदे गटाला निम्मे यश मिळाले. पाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीतही डोंगळे यांनी शिंदे शिवसेनेच्या प्रचारात भाग घेतला.
डोंगळे यांना राजीनामा देण्यास नेत्यांनी सांगताच महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ असे म्हणत थेट मुंबई गाठली. गोकुळच्या वाटचालीत एखाद्या निर्णयासाठी राज्य पातळीवरील नेत्यांकडे जाण्याची ही पहिलीच वेळ. अखेर अध्यक्षपद नविद मुश्रीफ यांना मिळाले. निवडणुकीच्या वर्षात अध्यक्षपद असणे याचा फार मोठा फायदा असतो. आज तो मुश्रीफ यांना मिळत आहे. या आधारावरच त्यांनी जोडण्या केल्या आहेत. करवीरमध्ये विश्वास पाटील, चंद्रदीप नरके, कागलमध्ये संजय घाटगे, युवराज पाटील, राधानगरी, भुदरगडमध्ये प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, अरुण डोंगळे, चंदगडला शिवाजीराव पाटील, राजेश पाटील, हातकणंगले, पन्हाळा व शाहूवाडीत विनय कोरे, शिरोळमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी नेत्यांसमवेत हसन मुश्रीफ यांनी सध्या मोर्चेबांधणी केली. आजर्यात स्वतः मुश्रीफ लक्ष घालत आहेत.
हे चित्र पाहता महाडिक यांना स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवायची झाल्यास या ठिकाणी स्वतःच्या जोडण्या कराव्या लागतील. सध्या महाडिक यांची रणनीती राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे दाद मागून निवडणूक लढविण्याची मानसिकता आहे.
या सार्या व्यूहरचनेमागे कळीचा मुद्दा आहे संचालकांची संख्या वाढविण्याचा. त्याचबरोबर केडीसीसीप्रमाणे गोकुळमध्ये सर्वपक्षीय बिनविरोध सत्ता आणण्याच्या मनसुब्यांना ब्रेक लावण्याची मानसिकता दिसते. संचालकांच्या वाढलेल्या जागांमध्ये तडजोड करून सतेज पाटील यांच्याबरोबर आघाडी करू नये, यासाठी महाडिक गटाचा आटापिटा आहे. स्वतः धनंजय महाडिक यांनी दूध उत्पादक आणि गोकुळचे नुकसान करणार्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालकांची जागा वाढविल्या असतील तर आम्ही त्याला टोकाचा विरोध करू यातूनच हे स्पष्ट होते.
गोकुळमधील सत्तांतरानंतर नेत्यांनी आपल्या तालुक्यातील दूध संस्थांना गोकुळचे सभासदत्व दिले आहे. त्यामुळे 1814 संस्था वाढल्या आहेत. या वाढलेल्या संस्थांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. सतेज पाटील यांच्या करवीर व गगनबावडा तालुक्यात अनुक्रमे 227 व 56 संस्था वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील कागलला 239, गडहिंग्लजला 129, आजर्यात 75 तर चंदगडला 79 संस्था वाढल्या आहेत. विनय कोरे यांच्या मतदारसंघातील पन्हाळ्यात 165 तर शाहूवाडीत 164 संस्था वाढल्या आहेत. आबिटकर यांच्या मतदारसंघात राधानगरी तालुक्यात 245 तर भुदरगडमध्ये 224 संस्था वाढल्या आहेत. राधानगरीतील संस्था वाढ सर्वोच्च आहे.