

गुडाळ: गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सर्व गटात मिळून एकूण 133 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यामध्ये आजी- माजी आमदार, 15 माजी संचालक तसेच विद्यमान जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. आज अखेर सर्व गटात मिळून 219 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.
दरम्यान,आज दिवसभरात १४५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून आज अखेर एकूण 952 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मात्र पात्र उमेदवारी साठी असलेल्या जाचक अटीमुळे विक्री च्या तुलनेत कमी प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. आज आमदार अशोकराव माने आणि माजी आमदार राजू आवळे या परंपरागत विरोधकांनी अनुसूचित जाती जमाती गटातून आपले अर्ज दाखल केले.
सर्वसाधारण गटातून आज एकूण 74 अर्ज दाखल झाले असून विशेष म्हणजे या गटातून आठ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये शौमीका महाडिक, पद्मजा आपटे, सुष्मिता राजेश पाटील, स्वाती कोरी, भाग्यश्री कर्णसिंह गायकवाड, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
त्या शिवाय या गटातून 15 माजी संचालकांसह जि प चे उपाध्यक्ष तानाजी पाटील, छत्रपती राजाराम चे उपाध्यक्ष गोविंदराव चौगले,भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, विद्याधर गुरबे, राहुल देसाई, सत्यजित जाधव,बाबासाहेब देवकर, अशोकराव फराकटे, रामचंद्र भोगम, भूषण पाटील,शाहू काटकर, अजित पाटील,सचिन घोरपडे, रविश पाटील कौलवकर आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
इतर मागासवर्गीय गटातून आज 22 व्यक्तींनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, नंदकुमार ढेंगे, अशोक चराटी, रघु पाटील, हिंदुराव चौगले आदींचा समावेश आहे. विमुक्त भटक्या जाती मधून आज आठ व्यक्तींचे अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माजी संचालक विश्वासराव जाधव, के डी सी च्या संचालिका स्मिता गवळी, राष्ट्रवादीचे पन्हाळा अध्यक्ष संतोष धुमाळ या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. एकंदरीत उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे नेते मंडळींना नाराज इच्छुकांची समजूत काढताना नाकी नऊ येणार आहे.