Gokul Election : ‘गोकुळ’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू

महायुतीच्‍या एन्ट्री‍ने राजकारण बदलले; सत्तेचे गणित बिघडले
‌Gokul Dairy |
Gokul Dairy |
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघा (गोकुळ) ची निवडणूक सहा महिन्‍यांपासून न्‍यायालयीन सुनावणीच्‍या चक्रव्‍यूहात अडकली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाने सोमवारी ६० दिवसांत निवडणूक घेण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर प्रक्रियेने गती घेतली आहे. तक्रारदारांचे आक्षेप, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्‍यातील आरोप-प्रत्‍यारोप यामुळे जिल्‍ह्यातील राजकीय वातावरण यापूर्वीच तापले होते. आता प्रत्‍यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, प्रारूप मतदारयादीवरील हरकती, सुनावणीदरम्‍यान वातावरण आणखी तापणार आहे. नेते, आजी-माजी संचालक यांनीही पायाला भिंगरी बांधत संपर्क दौरे सुरू केले आहेत. यामुळे जिल्‍ह्याचे राजकारण आता ढवळून निघणार आहे.

‘गोकुळ’मध्‍ये महायुतीचा शिरकाव झाला अन् शेवटच्‍या वर्षभरात ‘गोकुळ’चे संपूर्ण राजकारणच बदलून गेले. पक्षीय राजकारणामुळे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखालील सत्ताधारी पॅनेल पुरते बिघडले. सत्ताधार्‍यांचे १२ आणि विरोधी गटाचे चार असे एकूण १६ संचालक महायुतीच्‍या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. तर, पाच संचालक आमदार सतेज पाटील यांच्‍यासोबत आहेत. सद्यस्‍थितीत महायुतीचे पारडे जड वाटत असले, तरी अंतर्गत मतभेदांमुळे निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन जाताना मात्र नेत्‍यांचा कस लागणार आहे.

‘गोकुळ’च्‍या मागील निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी तीन दशकांनंतर ‘गोकुळ’मध्‍ये प्रथमच सत्तांतर घडवले. चार वर्षे त्‍यांच्‍या आघाडीचे काम सुरळीत सुरू होते. मात्र, शेवटच्‍या वर्षभरात ‘गोकुळ’मध्‍ये महायुतीच्‍या राजकारणाचा प्रवेश झाला. याचे पडसाद चेअरमन निवडीत उमटले. काँग्रेसचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव चेअरमनपदासाठी आघाडीवर होते. मात्र, शेवटच्‍या क्षणी महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे, या भूमिकेमुळे चुयेकर यांचा पत्ता ऐनवेळी कट झाला अन् नविद मुश्रीफ यांच्‍या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडली. या निवडीनंतर ‘गोकुळ’मधील राजकीय चित्रच बदलून गेले.

निवडणुकीची रणधुमाळी आजपासून शक्‍य

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर ‘गोकुळ’च्‍या निवडणुकीला गती येणार आहे. प्रारूप मतदारयादी बुधवारी (दि. १२) प्रसिद्ध होण्‍याची शक्‍यता आहे. यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीच्‍या रणधुमाळीला सुरुवात होईल. यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे हरकती व त्‍यावरील सुनावणी प्रक्रियेदरम्‍यान राजकारण चांगलेच तापणार आहे.

दुरावलेली मने एकत्र येणार?

मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजी पाटील यांच्‍यामधील टोकाचा राजकीय संघर्ष आजही कायम आहे. निवडणूक महायुती म्‍हणून एकत्र लढणार, असे नेते सांगत असले तरी दूध संस्‍थांची चौकशी, सुनावणी, एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्‍यारोप यामुळे महायुती नेत्‍यांमध्‍ये दुरावा आहे. राष्‍ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्‍यचे एकत्र, तर भाजपचे स्‍वतंत्रपणे संपर्क दौरे सुरू आहेत. यामधून महायुतीमधील दुरावा कायम असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे नेत्‍यांमधील दुरावलेली मने कितपत एकत्र येणारे हे ‘गोकुळ’च्‍या निकालानंतरच स्‍पष्‍ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news