

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा २० डिसेंबरनंतरच होणार आहे. सभेसाठी सहकार विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होईल. त्यानंतर अहवाल छपाई, संस्था सभासदांना सभेची नोटीस पाठविणे यासाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेरीस अथवा डिसेंबरच्या सुरुवातीस संचालक मंडळाची सभा झाल्यानंतर डिसेंबरअखेरीस सभा होणार आहे.
गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी तत्कालीन प्रशासक मंडळाने सहकार विभागाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार सहकार विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. दरम्यान, गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि वार्षिक सभा लांबणीवर पडली. आता संचालक मंडळ अस्तिवात आले असले तरी त्यांना वाढीव मुदतीतही सभा घेणे शक्य नसल्याने त्यांनीही सभेसाठी सहकार विभागाकडे मुदतवाढ मागितली. सहकार विभागाने पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत आता संचालक मंडळाला सभा घ्यावी लागणार आहे.
गोकुळमध्ये नियुक्त केलेले शासन नियुक्त संचालक त्यांना दिलेला मतदानाचा अधिकार याविरोधात समविचारी आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. याबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शासन नियुक्त संचालकांचे मतदान स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी बुधवारी (दि.२५) ठेवली आहे.