

कोल्हापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या निवडणुकीचा धुरळा लवकरच उडणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती मंगळवारी हटविली. त्यामुळे जिल्ह्यातील गोकुळसह प्रलंबित 432 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. गोकुळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाकडून बुधवारी (दि. 25) गोकुळकडे कच्ची मतदार यादी मागविली जाणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्थगिती दिली होती. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सन 2025 मधील प्रलंबित संस्था व सन 2026 मध्ये निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात 2025 पासून अ, ब, क व ड वर्गातील 432 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत तर संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत मे 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेलाही आता सुरुवात झाली आहे. गोकुळच्या मे 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या सुमारे तीन दशकांच्या सत्तेला तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि तत्कालीन ग््राामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विद्यमान पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके आदींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पराभूत करून सत्तांतर घडवले. या सत्तांतरानंतर काही काळातच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पण या बदललेल्या राजकीय समीकरणांचा गोकुळमधील सत्ताधारी पॅनेलवर कोणताही परिणाम सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी होऊ दिला नाही. या पॅनेलचा पाच वर्षांचा कालावधी मे 2026 मध्ये पूर्ण होत आहे.
राजकीय समीकरणे बदलणार
आत्ताच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आताापर्यंत सहकारात चाललेल्या स्थानिक आघाड्यांच्या राजकारणाला बगल देत प्रथमच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसे संकेत महायुतीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे गोकुळच्या सत्ताधारी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असून निवडणुकीत कशा पद्धतीने पॅनेल होणार याकडेही सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
आज गोकुळकडे मागविणार कच्ची मतदार यादी
नव्या आदेशानुसार गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाकडून बुधवारी (दि. 25) गोकुळकडून कच्ची मतदार यादी मागविली जाण्याची शक्यता आहे.
मे 2023 अखेरपर्यंतच्या संस्था मतदानासाठी पात्र
गोकुळ निवडणुकीसाठी मे 2023 अखेरपर्यंतच्या सभासद संस्था मतदानास पात्र राहणार आहेत. या तारखेपर्यंत गोकुळकडे 5 हजार 470 सभासद संस्थांची नोंद आहे. यापैकी किती संस्था निवडणुकीसाठी मतदानास पात्र राहणार हे मतदार यादीला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मे मध्ये गोकुळ निवडणूक शक्य
प्रारूप मतदार यादीपासून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेस साधारण: तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार मे महिन्यात गोकुळसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.