

कोल्हापूर : केळोशी बुद्रुकपैकी जाधववाडी (ता. राधानगरी) येथील सविता कोरे दूध संस्थेचे संकलन ५० लिटरहून कमी असूनही संबंधित दूध संस्था पात्र ठरली कशी, असा जाब दूध संस्था प्रतिनिधींनी मंगळवारी सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांना विचारला. यावर ठाकरे यांनी माहिती देण्यासाठी अजून मुदत आहे, माहिती दिली जाईल, असे उत्तर दिले. यावरून दूध संस्था प्रतिनिधी व सहायक निबंधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
अवसायनातील दूध संस्था प्रतिनिधींनी केळोशी बुद्रुकपैकी जाधववाडी येथील सविता कोरे दूध संस्थेच्या दूध संकलनाची माहिती मिळण्यासाठी सहायक निबंधक कार्यालयाकडे २ जुलैला माहिती अधिकारात अर्ज केला होता. संबंधित दूध संस्था अवसायन प्रक्रियेत होती. या संस्थेचे संकलन ५० लिटरहून कमी असतानाही ही संस्था पात्र ठरविल्याचा आराेप संस्था प्रतिनिधींनी केला आहे. मंगळवारी त्यांनी सहायक निबंधक ठाकरे यांची भेट घेऊन संबंधित संस्थेची माहिती मिळण्याची मागणी केली. यावर ठाकरे यांनी न्यायालयात जायचे असल्याने नंतर माहिती देतो, असे सांगितले. यावर कागलचे विकास पाटील यांनी अर्ज करून किती दिवस झाले, अशी विचारणा करत आताच माहिती मिळण्याची मागणी केली. यावरून सहायक निबंधक ठाकरे व पाटील यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. यामुळे येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.