Kolhapur Gokul News : पशुखाद्य विक्री आली तोट्यात; ‘गोकुळ’ला २४ कोटी रुपयांचा फटका

प्रतिगोणी दोनशे रुपयांचे नुकसान
Kolhapur Gokul News
Kolhapur Gokul News
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, ‘गोकुळ’कडून महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्‍वावर चालविला जात आहे. मात्र, सद्यस्‍थितीत कच्‍च्‍या मालाचे दर वाढले असून, पशुखाद्य विक्री दर ‘जैसे थे’च आहेत. त्‍यामुळे पशुखाद्य विक्री तोट्याची ठरत आहे. त्‍याचबरोबर इंधन दरवाढ आणि पॉलिथिन फिल्‍मच्‍या किमतीत झालेल्‍या वाढीचाही फटका ‘गोकुळ’ला बसत आहे. त्‍यामुळे ‘गोकुळ’ला २४ कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाल्‍याचे समजते.

‘गोकुळ’ दूध संघावर मे महिन्‍यापासून प्रशासक नियुक्‍त केले आहेत. त्‍यामुळे सध्‍या ‘गोकुळ’चा कारभार प्रशासकांच्‍या हातामध्‍ये आहे. दरम्‍यान, ‘गोकुळ’मध्‍ये प्रशासकांना काही धोरणात्‍मक निर्णय घेताना मर्यादा येत आहेत. त्‍यामुळे ‘गोकुळ’चे आर्थिक नुकसान होत असून, कारभार संचालक मंडळाच्‍या हातामध्‍ये लवकर येणे आवश्‍यक आहे, असे वक्‍तव्‍य आ. सतेज पाटील यांनी केले आहे.

गेल्‍या वर्षभरात इंधन खर्चात वाढ झाली आहे. तसेच, युद्ध‍जन्‍य परिस्‍थितीमुळे पॉलिथिन फिल्‍मच्‍या दरातही ३० ते ३५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. याचा परिणाम ‘गोकुळ’च्‍या अर्थचक्रावर झाला आहे. तसेच, पशुखाद्य विक्री दरात वाढ न केल्‍याने प्रतिगोणी सुमारे २०० रुपये तोटा होत आहे. महिन्‍याकाठी सुमारे १२ हजार टन पशुखाद्याची विक्री होते.

दरम्यान, ‘गोकुळ’च्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखान्‍यात चार प्रकारची पशुखाद्ये तयार केली जातात. महालक्ष्‍मी गोल्‍ड, कोहिनूर डायमंड, मिनरल मिक्‍चर या पशुखाद्यांच्‍या ५० किलोच्‍या प्रतिगोणीमागे वर्षभरापूर्वी ५० रुपये कपात करण्‍याचा निर्णय ‘गोकुळ’ने घेतला होता. त्‍यानंतर पशुखाद्यासाठी लागणार्‍या कच्‍च्‍या मालाच्‍या दरात वाढ होत गेली. मात्र, आजही गतवर्षीच्‍या दरानुसारच पशुखाद्याची विक्री सुरू आहे. सद्यस्‍थितीत प्रतिकिलो तीन ते चार रुपये दरवाढ करणे आवश्‍यक आहे. मात्र, ही दरवाढ न केल्‍याने सध्‍या प्रतिगोणी सुमारे २०० रुपये तोटा होत असल्‍याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news