

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीकडे १,८५१ दूध संस्थांचे ठराव आहेत. ठरावाच्या आकड्यात कोणताही फरक पडणार नाही, असे सांगत ४,५७५ संस्था गोकुळ निवडणुकीसाठी पात्र आहेत; मात्र महायुतीच्या घटक पक्षांनी ठरावांची सांगितलेली आकडेवारी पाहता ती ५,३०० पर्यंत जाते. यावरून त्यांची आकडेवारी फुगीर असल्याचा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
धैर्यप्रसाद हॉल येथे मंगळवारी आघाडीचा मेळावा झाला. यावेळी अपात्र ठरलेल्या संस्था पात्र ठरविल्याशिवायही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले, गोकुळसाठी पात्र ५,४७० दूध संस्था होत्या. यापैकी ६४४ दूध संस्था अपात्र ठरल्या आणि आता २६९ संस्थांचे सभासदत्व रद्द होणार आहे. त्यानुसार आता ४,५७५ संस्था गोकुळ निवडणुकीसाठी पात्र आहेत. समविचारी आघाडीने आतापर्यंत ९७९ ठराव दाखल केले आहेत. मंगळवारी व बुधवारी आणखी ८७१ ठराव दाखल करणार असे एकूण १,८५१ ठराव आहेत. यापैकी बहुतांश संस्था प्रतिनिधींनी ठराव देताना माझ्यासोबत फोटो घेतला आहे. त्यामुळे समविचारीच्या ठराव संख्येत बदल होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.