

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या 1,200 दूध संस्थांबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी आता मंगळवारी (दि. 10) होणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे जाणून घेतले. सुनावणी लांबल्याने सोमवारपासून सुरू होणारी ठराव मागणीची प्रक्रियाही थांबणार आहे. मंगळवारच्या सुनावणीनंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सहायक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे यांनी सांगितले.
उत्तूर (ता. आजरा) येथील महादेव व्यावसायिक दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ‘गोकुळ’च्या बोगस 1,200 दूध संस्थांवर कारवाई करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. याचिकेवर पहिली सुनावणी 4 मार्च रोजी होती. मात्र, या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख शनिवार, दि. 7 मार्च दिली होती. त्यानुसार आज सुनावणी झाली. सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे जाणून घेतले. सुनावणीदरम्यान दूध संस्था अवसायनात काढण्याबाबतच्या नोटीसला स्थगिती देणाऱ्या सहकारमंत्र्यांच्या आदेशावर व यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकारमंत्र्यांशी केलेल्या पत्रव्यवहारातील पत्रावर तारीखच नसल्याने याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच, यासंदर्भात स्थगिती आणण्याचे अधिकार सहकारमंत्र्यांना नाहीत, त्यामुळे हे आक्षेपार्ह असल्याचे सांगितले. पुढील सुनावणीची तारीख मंगळवार, दि. 10 मार्च दिली आहे. पुढील सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.