

जयसिंगपूर : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटर सायकल ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमारी गंगा पिंटू व्हनमोरे (वय १३ रा. दत्तनगर शिरोळ) ही मुलगी जागीच ठार झाली. तर मुलीचे आई- वडील जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिरोळ येथे जयसिंगपूर मार्गावरील गणेशनगर स्टॉप शेजारी घडली. जखमीस सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पिंटू रामचंद्र व्हनमोरे हे आपली पत्नी सौ संजना पिंटू व्हनमोरे आणि मुलगी गंगा पिंटू व्हनमोरे असे तिघेजण आपली मोटरसायकल घेऊन सायंकाळी येथील बुवाफन मंदिरासमोरील आठवडी बाजारात बाजारासाठी गेले होते. आपल्या घरातील बाजार घेऊन ते पुन्हा मोटरसायकलवरून घरी दत्तनगरकडे चालले होते.
या दरम्यान, जयसिंगपूर दिशेला जाणारा ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर गणेशनगर बस स्टॉप नजीक आला असता. या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिंटू व्हनमोरे हे आपल्या ओव्हरटेक करत असताना धडक बसली. मोटरसायकलवरील कु. गंगा पिंटू व्हनमोरे ही १३ वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ठार झाली. तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे संपूर्ण डोक्याचा चेंदामेंदा झाला. पिंटू रामचंद्र व्हनमोरे यांच्या पायाला व सौ. संजना पिंटू व्हनमोरे यांच्या हाताला दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.