

बा. ल. वंदुरकर
कागल: कागल तालुक्यातील बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटल नर्सिंग होम या हॉस्पिटलवर पोलिसांनी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यापूर्वी तीन वेळा छापा टाकला. गर्भलिंग निदान तपासणी करताना हॉस्पिटलचा डॉ. युवराज पाटील याला पकडले, अटक केली. त्याचा परवाना रद्द करण्यात आला. गर्भपात होत असल्याची उघड झाले. या सर्व प्रकाराबाबत कागल तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आतापर्यंत अनभिज्ञ कसे काय? याचे गौडबंगाल काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, या हॉस्पिटलची नोंदणी स्थगित करण्यात आल्याची नोटीस लागू करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अटक सत्र सुरू केल्यानंतर आणि याप्रकरणी तेरा जनावर गुन्हा दाखल होऊन 11 जणांना अटक केल्यानंतर कागल पंचायत समितीचा आरोग्य विभाग जागा झाला आहे. त्यांनी आता श्रद्धा हॉस्पिटल व नर्सिंग होम हे हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली होती; परंतु दि.22 मार्च रोजी हॉस्पिटलवर गर्भलिंग तपासणी अंतर्गत कारवाई झालेली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या कारवाईमुळे बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत नोंदणी स्थगित करण्यात येत आहे. त्यामुळे बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या सेवा यापुढे आपल्या हॉस्पिटलमध्ये देऊ नये. तसेच नोटीस मिळाल्यानंतर आपला खुलासा दोन दिवसांत देण्यात यावा, अन्यथा आपली नोंदणी रद्द करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारूक देसाई यांनी हॉस्पिटलला दिलेली आहे. ही नोटीस हॉस्पिटलमध्येही चिकटवण्यात आलेली आहे. तसेच पोस्टानेही पाठवण्यात आलेली आहे.
दुर्लक्ष की कानाडोळा?
बिद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व इतर कर्मचारी असूनही या हॉस्पिटलमध्ये राजरोस सुरू असलेला गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी याची माहिती नसल्याची बाब गंभीर आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी आणि विस्तार अधिकारी व आरोग्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्ष झाले आहे की कानाडोळा करण्यात आला आहे, याचीदेखील सध्या चर्चा सुरू आहे. वैद्यकीय विभागाने नजर ठेवणे, तपासणी करणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही.