

वारणानगर : पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅसचा भडका उडून पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुवर्णा धोंडिराम इरवाडकर (वय 40) आणि धोंडिराम अधिक इरवाडकर (45) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
जाखले गावातील कमानीजवळ धोंडिराम इरवाडकर यांचे घर आहे. सकाळी शेतावर लवकर जाण्याच्या तयारीत असताना, त्यांची मुलगी ज्योती अजित माळी गॅस शेगडीवर भाकरी बनवत होती. त्याचवेळी अचानक गॅस टाकीच्या पाईपने पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. जवळच असलेल्या सुवर्णा यांच्या साडीने पेट घेतल्याने त्या आणि त्यांची मुलगी ज्योती यांनी आरडाओरडा सुरू केला. खोलीतून आवाज येताच धोंडिराम धावत आले आणि त्यांनी पत्नीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत सुवर्णा यांचे दोन्ही पाय आणि पाठ गंभीररीत्या होरपळली, तर धोंडिराम यांचे हात-पाय भाजले. दोघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवले आहे.