kolhapur Crime News | बिहार-उत्तर प्रदेशची कशाला बात, ‘कोटी’साठी धमकी कोल्हापुरात!

अजित तिवडे गँगची दहशत; जामिनावर बाहेर पडताच पुन्हा कारवाया
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आमचा कोटीचा विषय संपव, मगच तुझे बांधकाम सुरू कर.. ही धमकी बिहार, उत्तर प्रदेशमधील नसून चक्क कोल्हापुरातील आहे. खून प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुंड अजित तिवडेसह त्याच्या साथीदारांच्या खंडणीप्रकरणी मुसक्या आवळल्यानंतर कोल्हापुरातील गुंडगिरीला पुन्हा एकदा वाचा फुटली.

एक कोटीसाठी ७ दिवसांची मुदत

२९ एप्रिलला रकाळी ११ वा. चौघेही संशयित संजयच्या लाल रंगाच्या मोटारीतून निलेशच्या साईटवर आले. त्यांनी निलेशच्या अपहरणासाठी त्याची मोटार वापरली. अपहरण करुन त्याला खोलीत डांबून ठेवले. ७ दिवसात १ कोटी रु. देण्याच्या अटीवर सायंकाळी निलेशची सुटका केली. नंतर घाबरलेल्या निलेशने दोन महिने पुण्यात मुक्काम केला.

कुख्यात एटी गँगची दहशत

अजित तिवडेसह त्याच्या एटी गँगची रुईकर कॉलनी, तावडे हॉटेल, गांधीनगर, नागाळा पार्कसह व्यावसायिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अजित तिवडेवर ९ गंभीर गुन्हे दाखल असून, २००१ मध्ये गांधीनगर येथील दरोडा, सांगली येथील कोल्हे खून प्रकरण, सायबर चौकात २०१० मध्ये झालेले अवधूत माळवी खुनासह गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याचे साथीदार फैय्याजवर ६ गुन्हे असून, संजयवर चार आणि इतर साथीदारांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

फ्लॅटच्या बहाण्याने एंट्री

फय्याज नगराजी हा साळोखेनगर परिसरात राहत असून, तोच पहिल्यांदा नीलेश जाधव यांच्या बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने जाधव यांच्यासोबत ओळख वाढवून जाधव यांचे अपहरण केल्याचे समोर आले.

टोळीत फाटाफूट

गांधीनगर येथील दरोड्यामध्ये अजित तिवडेसह, स्वप्निल, काळबा यांची नावे समोर आली होती. अवधूत माळवी खून प्रकरणानंतर अजित तिवडे आणि स्वप्निल तहसीलदार यांच्यात फाटाफूट झाली. रुईकर कॉलनीत ए. टी. गँग विरुद्ध एस. टी. असा संघर्ष सुरू झाला. याचाच प्रत्यय २०२५ च्या महापालिका निवडणुकीमध्ये आला. प्रभाग क्रमांक ३ मधून अजित तिवडेने स्वप्निल तहसीलदारच्या पत्नी विरोधात निवडणूक लढवली. अजित तिवडे जामिनावर बाहेर येताच त्याने तीन आलिशान मोटारी खरेदी केल्या होत्या, तर एक थार मोटार त्याला भेट दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news