

कोल्हापूर : अधूनमधून पडणार्या भुरभुर पावसात गणेश दर्शन व देखावे पाहण्यासाठी लोकांनी शहरात मोठी गर्दी केली होती. यामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शहर व उपनगरातील रस्ते गर्दीने फुलले होते.
शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ यांसह सर्व पेठा राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, छत्रपती शिवाजी चौक, रंकाळा टॉवर, शिवाजी उद्यमनगर, उपनगरे व शहराभोवतीच्या ग्रामीण भागातील गणेश दर्शन व देखावे लोकांनी आवर्जून पाहिले. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लोक सहकुटुंंब चारचाकी व दुचाकी वाहनांतून देखावे पाहण्यासाठी दुपारपासूनच शहरात दाखल झाले होते. सायंकाळनंतर गर्दीत वाढ झाली.
गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी (गुरुवार) कोल्हापुरातील पेठा व उपनगरातील गणेशमूर्ती, विविध प्रतिकृती, तांत्रिक व सजीव देखावे पाहण्यासाठी लोक नियोजन करून घराबाहेर पडले होते. यामुळे रात्री अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस, होमगार्ड तैनात होते. गर्दीच्या चौकात बॅरिकेडस्, एकेरी वाहतुकीसह पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, शहरातील रहिवाशांनी चालत देखावे पाहणे पसंत केले.
देखावे पाहाण्यासाठी झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे शहरातील खाऊ गल्ल्यांसह हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले होते. चमचमीत पदार्थांवर लोकांनी आवर्जुन ताव मारला. याशिवाय मंडळांच्यावतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, चहा, महाप्रसाद, मसाले भात, कळ्या, राजगिरा लाडू, भडंग अशा खाद्य पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. याचाही लाभ लोकांनी घेतला. संभाव्य गर्दीमुळे ठिकठिकाणी फन पार्क, विविध खेळण्यांचे नियोजन करण्यात आले होते. याचाहीही लाभ अबालवृध्दांनी आवर्जुन घेतला.