Kolhapur Ganesh Festival | गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; ६० मंडळांच्या आवाजाचे नमुने

काही मंडळांकडून आवाज मर्यादेचे उल्लंघन; कारवाई होणार
कोल्हापूर : आगमन मिरवणुकीत पोलिसांनी साऊंडचा वापर करणाऱ्या मंडळांच्या आवाजाचे नमुने घेतले.
कोल्हापूर : आगमन मिरवणुकीत पोलिसांनी साऊंडचा वापर करणाऱ्या मंडळांच्या आवाजाचे नमुने घेतले. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत साऊंडचा दणदणाट करणाऱ्या ६० मंडळांच्या आवाजाचे नमुने पोलिस प्रशासनाने घेतले आहेत. शहरातील चारही पोलिस ठाण्याच्या अंतर्गत हे नमुने घेण्यात आले असून, काही मंडळांनी आवाज मर्यादा ओलांडल्याची प्राथमिक माहिती आहे. राजारामपुरीतील काही मंडळांनी ८० ते ९० डेसीबलपर्यंत आवाज नेला असून, त्यांना लवकरच नोटीस पाठविण्यात येणार आहे.

पोलिस प्रशासनाने दोन बेस दोन टॉपला परवानगी देत आवाज मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन तरुण मंडळांना केले आहे. शहरात गणेश आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह साऊंडचा वापर केला. पोलिस प्रशासनाने चारही पोलिस ठाण्याच्या अंतर्गत साऊंडचा वापर करणाऱ्या मंडळांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. ज्या मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशा मंडळांना येत्या दोन दिवसांमध्ये नोटीस पाठविण्यात येणार असून, त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

टेंबलाई तरुण मंडळाचा साऊंड जप्त

मध्यरात्री साऊंडची ट्रायल घेऊन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या टेंबलाईवाडी तरुण मंडळावर राजारामपुरी पोलिसांनी धडक कारवाई केली. ट्रायलची माहिती मिळताच साऊंड मध्यरात्रीच जप्त करून त्यांना मिरवणुकीतही परवानगी नाकारली. याचसोबत जागेवर त्यांचा साऊंडही जप्त करण्यात आला.

शहरातील चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आगमन मिरवणुकीत साऊंडचे नमुने घेण्यात आले आहेत. आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेल्या मंडळांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रिया पाटील, पोलिस उपअधीक्षक

राजारामपुरीत मिरवणुकीदरम्यान पोलिस-कार्यकर्त्यांत वादावादी

राजारामपुरी मिरवणूक मार्गावर काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या वतीने स्वागत कक्ष उभारले होते. याठिकाणी प्रत्येक मंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. भगवे ध्वज व पारंपरिक पोशाखातील फेटे परिधान केलेल्या महिला, बालगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. दरम्यान, मिरवणुकीत पोलिस -कार्यकर्त्यांत वादावादी झाली.

मिरवणुकीतील २० फुटी नंदीवर बसलेला गणपती, गोरीला यांनी लक्ष वेधून घेतले. अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक विकास जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी मिरवणूक मार्गावर फिरून मंडळांना ‘आवाज लिमीट’मध्ये ठेवण्याच्या सूचना देत होते. मात्र, ‘दोन बेस आणि दोन टॉप’च्या नियमाची सर्रास पायमल्ली झाली. साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त होता.

पोलिस, प्रशासनाच्या आवाहनास हरताळ

यावर्षीच्या गणेशोत्सवात मोठी साऊंड सिस्टीम वापरू नका, आवाजाची मर्यादा राखा, ‘दोन टॉप व दोन बेस’च्या नियमांचे पालन करा, असा इशारा व जनजागृती पोलिस, प्रशासनाकडून करण्यात आली खरी, मात्र, गणरायाच्या आगमन मिरवणुकीत राजारामपुरीतील गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनास हरताळ फासत साऊंड सिस्टीमचा कानठळ्या बसवणारा आवाज कायम ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news