

गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पती जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. बळवंत अनंत कुलकर्णी (वय 68, रा. इंगळी, ता हातकणंगले) असे मृताचे नाव असून, पत्नी भारती कुलकर्णी (62) गंभीर जखमी आहेत.
याची फिर्याद सागर पाटील (रा. सरनोबतवाडी) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. बळवंत कुलकर्णी हे दुचाकीवरून (एम. एच. 10 एटी 7164) सकाळी पत्नीसह कोल्हापूर येथील पाहुण्यांकडे गेले होते. परतताना गडमुडशिंगीतील महात काट्याजवळ हुपरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. के. ए.22 डी. 9353) दुचाकीला धडक दिली. बळवंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ट्रकचालक जय प्रल्हाद तिप्पे (वय 32, रा. गायकवाडी निपाणी) याला नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असल्याने चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.