

गडहिंग्लज: पुढारी वृत्तसेवा: बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील उत्तम भरमू नाईक (वय ५०) याला ‘माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस’, असे म्हणून त्याच गल्लीत राहणार्या सचिन भीमराव नाईक (वय ३६) याने जानेवारी महिन्यात लाकडी ओंडका मारुन संपविले होते. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा आकाश याने सचिन भीमराव नाईक याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा नेम चुकला अन् त्याच्यासोबत असलेल्या अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव (वय ४५) याला आपला जीव गमवावा लागला. खून का बदला खून करण्याच्या नादात यामध्ये दुसर्याचाच बळी गेला. मंगळवारी (दि.१९) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
जानेवारी महिन्यात सचिन नाईक याने माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस, असे म्हणून उत्तम नाईक याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत उत्तम हा मयत झाला होता. त्यानंतर सचिन याला अटक झाली होती. दोन महिन्यापूर्वी सचिन जामिनावर सुटला होता. उत्तम याचा मुलगा आकाश याला मात्र सचिन याने त्याच्या वडिलांचा खून केल्याचा राग मनात होता. यातूनच त्याने सचिन याला संपविण्याचा निर्धार केला होता.
यातूनच टेहळणी करुन आकाश याने लखन परशराम नाईक (रा. वाटंगी, ता. आजरा) याला सोबत घेऊन सचिन याला आज संपविण्याचा निर्णय घेतला होता. सचिन व अजित गुरव हे बिद्रेवाडीवरुन हेब्बाळ रोडवर जात असताना आकाश याने मोटारसायकलची बॅटरी सचिनच्या दिशेने जोरदार भिरकावली. सचिन याने ही बॅटरी चुकविताच मागे बसलेल्या अजित याच्या डोक्याला जोरदार धडकली. यातच कवटीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी तातडीने या प्रकरणी हालचाली करत सपोनि आबा गाढवे यांनी आकाश व लखन याला अटक केली.