

अनुराधा कदम
कोल्हापूर : उत्पादन आणि अभियांत्रिकीचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूरचा फौंड्री उद्योग आता केवळ निर्मितीपुरता मर्यादित न राहता ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत आहे. वाढत्या ऊर्जा खर्चाला पर्याय म्हणून पुनर्वापर आणि अक्षय ऊर्जेचा अवलंब करत हा उद्योग भविष्यात राज्याचे ‘ऊर्जा बचत हब’ बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. या ध्येयपूर्तीसाठी राज्यातील पहिले ऊर्जा व्यवस्थापन केंद्र कोल्हापुरात कार्यान्वित होत असून, यातून ‘ग्रीन इंडस्ट्रीज’ची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
जागतिक स्तरावर ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर फौंड्री उद्योजक प्रकाश मालाडकर यांच्या पुढाकारातून आणि गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (गोशिमा) सहकार्याने हे ऊर्जा व्यवस्थापन केंद्र ‘गोशिमा सेंटर ऑफ एक्सलन्स’ येथे उभारले जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारचे ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी’ (इएए) आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) यांचेही पाठबळ मिळाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील 400 फौंड्री युनिटस् आणि संलग्न उद्योगांना ऊर्जा वापराचे विश्लेषण करून कार्यक्षम तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे उत्पादन खर्चात मोठी कपात होऊन, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यास बळ मिळेल.
ऊर्जा ऑडिट : उद्योगांमधील ऊर्जेचा वापर तपासून गळती शोधणे
तंत्रज्ञान मार्गदर्शन : प्रत्येक यंत्रणेसाठी कार्यक्षम मॉडेल्स आणि उपकरणे सुचवणे
रिअल टाईम मॉनिटरिंग : ऊर्जेच्या वापरावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली बसवणे
प्रशिक्षण आणि धोरण : उद्योजक व कर्मचार्यांसाठी कार्यशाळा, सल्ला व नवीन धोरणनिर्मितीस मदत करणे
शून्य टक्के कार्बन उत्सर्जन करणार्या ‘अल थर्मोस’ या अॅल्युमिनियम होल्डिंग फर्नेसच्या निर्मितीसाठी कोल्हापूरचे उद्योजक प्रकाश मालाडकर यांना संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या संशोधनामुळे फौंड्री उद्योगात सुटे भाग बनवण्यासाठी लागणार्या ऊर्जेत 85 टक्के बचत आणि उत्पादन खर्चात 30 टक्के कपात शक्य झाली आहे.