

कोल्हापूर : लोकसहभागातून कोल्हापूर वन विभागाने २० दिवसांत वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले. यातून सुमारे तीन कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंवर्धनासाठी विविध उपाय करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या उपक्रमाची सुरुवात महात्मा गांधी जयंतीदिनी (२ ऑक्टोबर) व वन्यजीव सप्ताहानिमित्त करण्यात आली. अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यासाठी वनमंत्री गणेश नाईक, मुख्य वनसंरक्षक ए. लक्ष्मी आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
वन विभागाने एक हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अभियानामुळे जलसंधारणाला चालना मिळण्यासोबतच वनक्षेत्रातील पाणीसाठा वाढविणे, भूजल पुनर्भरण आणि जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. बंधाऱ्यांमुळे वनक्षेत्रात पाणवठे निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची उपलब्धता होईल. परिणामी, वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता कमी होऊन मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत होणार आहे.