

Kolhapur Rain Update:
कुरुंदवाड : राज्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे कृष्णा नदीवरील औरवाड पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील पुलाच्या स्लॅबवरही पाणी चढले आहे. त्यामुळे आज (दि.२६) सायंकाळपर्यंत हा पूलही पूर्णपणे जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या नदीचा प्रवाह मंद असला तरी पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुढील काही तासांत पाणी आणखी दोन ते तीन फूट वाढल्यास शिरढोण–कुरुंदवाड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने वाहनचालक आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी: २ फूटांनी वाढून ३३ फूट ५ इंच झाली आहे,पंचगंगा नदीची पाणी पातळी: १ फूट वाढून ३५ फूट झाली आहे.,कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग: १,०५० क्यूसेक्स, वारणा धरणातून विसर्ग: १,७३० क्यूसेक्स,पंचगंगा नदीतून विसर्ग: ३,६२२ क्यूसेक्स, राजापूर बंधाऱ्यातून एकत्रित विसर्ग: ८४,०८३ क्यूसेक्स हे पाणी थेट कर्नाटकात सोडले जात आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुलावरून कोणतीही वाहने, दुचाकी किंवा पादचारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत, पोलीस आणि महसूल विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
शिरढोण–कुरुंदवाड पुलावर वाढणारे पाणी आणि धरणांमधून सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग लक्षात घेता, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.