

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. त्याचबरोबर आता कुरुंदवाड शहराच्या दिशेने पंचगंगा नदीची वाटचाल सुरू झाली आहे. घोसरवाड रस्त्यावरही पाणी आले आहे. त्यामुळे मार्ग बंद झाला आहे. भैरववाडीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
दरम्यान कुरुंदवाड शहरातील गोठणपूर परिसरातील 347 म्हैशी आणि 400 हून अधिक शेळ्या तेरवाड-गंगापूर येथे स्थलांतर करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून तेरवाड येथे चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे.
येथील गोठणपूर परिसरातील करमरे दड्डीच्या पुढे सावगावे गल्लीपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. कोठावळे गल्लीतील 12 कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले आहे. कोरवी गल्लीतील मरगुबाई मंदिराच्या पायरीला पाणी लागले आहे. गोठणपूर परिसरातील जनावरांचे तेरवाड येथील भोला बारगिर, राजू अत्तार, रामचंद्र डांगे, विलास कांबळे यांच्या गोडाऊनमध्ये जनावरांचे स्थलांतर करण्यासाठी त्यांनी जागा दिली आहे.
भैरववाडीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. भैरववाडी परिसरातील नागरिकांनी ही आपली जनावरे स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. हेरवाड - घोसरवाड मार्गावर ही पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हेरवाड मध्ये सुतार वस्तीत काल महापुराचे पाणी आल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. त्याचबरोबर येथील कन्याशाळे मागे असणाऱ्या इटाज गल्ली, बंडगर गल्ली आदी ठिकाणचे नागरिक पुराचा धोका ओळखून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत.