

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा विळखा पडलेला असताना कृष्णा नदीवरील विजापूर येथील अलमट्टी धरणातील विसर्ग सायंकाळी ६ वाजता २ लाख ७५ हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. अलमट्टी धरणातून हा दिलासा मिळालेला असतानाच सातारा जिल्ह्यातील कोयना तर कोल्हापुरातील राधानगरी या दोन महत्त्वाच्या धरणातून विसर्ग वाढलेला आहे. (Kolhapur Flood Update)
अलमट्टी धरण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणातील बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दर वर्षी पूरस्थितीला तोंड द्यावे लागते. आज सायंकाळी ६ वाजता या धरणातून २ लाख ७५ क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात आलेला होता. या धरणाची क्षमता १२३. ०८१ टीएमसी इतकी आहे, तर हे धरण आज सायंकाली क्षमतेच्या ७० टक्के म्हणजे ८६.८४५ टीएमसी इतके भरले आहे. धरणात पाण्याची पातळी ५१७.१९ मीटर इतकी आहे.
कोल्हापूर शहरात राजाराम बंधारा येथे धोका पातळी ४३ फूट आहे. येथे पंचगंगा नदीची पातळी सायंकाळी ६ वाजता ४३.५ फूट इतकी होती. दरम्यान राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून यातून एकूण ८६४० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. धरणाचे ३, ४, ५, ६ आणि ७ क्रमांकाचे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर शहराबाहेरील चिखली, आंबेवाडी अशा काही गावांना पुराचा वेढा पडलेला आहे. कोल्हापुरातील एकूण ८५ बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.