सैनिक टाकळी : धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील दानवाड-एकसंबा या कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलावर आज (दि. २५) पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. हा पूल दूधगंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे. या नदीमध्ये राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरु आहे. चिकोडी आणि शिरोळ तालुक्याला जोडणारा दानवाड पूल वाहतुकीसाठी बंद आहे.
राधानगरी धरण १०० टक्के भरल्यामुळे एक स्वयंचलित दरवाजा उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पाणी पातळीत वाढ होत असल्याने दानवाड येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नागरिकांनी आपल्या जनावरांचे स्थलांतर सुरू केले आहे. सैनिक टाकळी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन कर्नाटक येथील एकसंबा येथे आहे. त्यांचे जनावरांचे गोठेही तेथेच आहेत. त्यांना जनावरांचे स्थलांतर महाराष्ट्रात करता येणार नाही. कर्नाटकातील नणंदीमध्येच स्थलांतरित व्हावे लागणार आहे. शिरोळ तालुक्यात जाण्यासाठी केवळ एकसंबा बोरगाव हा एकमेव मार्ग खुला आहे.
आमचे आधार कार्ड महाराष्ट्रातील असल्यामुळे आम्हाला कर्नाटकातील सुविधा मिळत नाहीत. जमीन गोठा कर्नाटक हद्दीत असल्याने महाराष्ट्रातही आमच्या जनावरांची सोय होत नाही. २०१९ आणि २०२१ च्या महापुरावेळीही मदत मिळाली नाही.
- अभिजीत पाटील, पूरग्रस्त शेतकरी सैनिक टाकळी